अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्या फेसबूक व व्हाट्सअपच्या माध्यमातून फसवणूक केली जात असून ब्लॅकमेल करून आर्थिक मागणी केली जाती. नेमकी कशी फसवणूक केली जाते व त्यावर काय काळजी घ्यावी याबाबत अहमदनगर येथील सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी माहिती दिली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक दुधाळ म्हणाले की, बराच वेळा एखादी सुंदर मुलगी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. आणि ती एक्सेप्ट केल्यानंतर ती मुलगी फेसबुक मेसेंजर वर तुमच्याशी मैत्री करू इच्छिते.
त्यानंतर ती तुम्हाला व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करायचा आहे असे सांगून तुमचा व्हाट्सअप नंबर देण्याचा तगादा लावते. सुंदर मुलीशी गप्पा मारायला मिळतात म्हणून तुम्ही तुमचा व्हाट्सअप नंबर दिला कि ती तुम्हाला व्हिडिओ कॉल करते.
बोलता बोलता ती अश्लील संभाषण करू लागते आणि नकळत तुम्ही देखील अश्लील संभाषण वर्तन करू लागतात. अशावेळी ती स्क्रीन रेकॉर्ड द्वारे तुमचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवते.
त्यानंतर पुन्हा ती तुम्हाला कॉल करून तुमचा अश्लील व्हिडिओ मी काढलेला आहे तुम्ही पैसे द्या नाहीतर तुमचा व्हिडिओ तुमच्या सर्व फेसबुक मित्राला मी पाठवेल अशी धमकी देऊ लागते.
भीतीने तुम्ही तीने मागितलेली रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करू लागता. तिची मागणी काही संपत नाही ती वेगवेगळ्या धमक्या देऊन तुम्हाला ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर करायला लावते अशाप्रकारे लाखो रुपयांची लूट केली जाते.
तरी सर्वांना विनंती आहे की अशी कोणत्याही प्रकारची अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका त्यांना आपला नंबर देऊ नका किंवा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ चॅटिंग करू नका.
असे आढळून आल्यास पोलिसात तक्रार करा असे आवाहन नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे , अहमदनगर यांनी केले आहे.