अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- लग्न करणे सोपे आहे. परंतु वैवाहिक संबंध यशस्वी करणे आणि ते शेवटपर्यंत टिकवणे सोपे नाही. रिलेशनशिप एक्सपर्ट्स म्हणतात की, नात्याला सुखी ठेवण्यासाठी बर्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांच्या भावना समजून घेणे.
प्रत्येक विवाहित जीवनात लहान लहान समस्या येत असतात, परंतु जर वेळेत त्या गोष्टी सोडवल्या तर त्या गोष्टी मोठ्या होत नाहीत. बरेच लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उघडपणे बोलण्यापासून परावृत्त असतात. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलून अथवा घरातील मोठ्या व्यक्तीची मदत घेऊन अनेक समस्या नक्कीच सोडवता येऊ शकतात. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही चुका सांगत आहोत ज्या टाळून तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवू शकता.
लपवा-छपवी करणे :- लग्नामुळे एकमेंकांमधील प्रेमाची भावना अधिक मजबूत होते. प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल नितांत विश्वास आणि एकमेकांना सुखी करण्याची भावना. मात्र जर तुमच्या नात्यात विश्वासच नसेल तर ते नातं लवकर कमजोर पडू शकते. एखादी गोष्ट लपविणे म्हणजे जोडीदारासोबत अविश्वास दाखविणे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारापासून एखादी गोष्ट लपविता तेव्हा इतर लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात.
शिवाय काही कारणांनी ती गोष्ट तुमच्या जोडीदारासमोर आली तर ते तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणं फार कठीण होऊ शकतं. यासाठी एकमेकांपासून कोणतीच गोष्ट लपवू नका.
लहान-सहान गोष्टींवरून वाद घालणे :- अनेक लग्न झालेली जोडपी सतत वाद घालताना दिसतात. नवर-बायकोच्या छोट्या छोट्या भांडणांमध्ये लक्ष घालू नये असं म्हणतात. भांडणांमुळे प्रेम दृढ होतं वगैरे गोष्टी फक्त ऐकायला चांगल्या वाटतात. कारण सतत होणाऱ्या भांडणांमुळे तुमच्यामधील नात्यात कटूपणा येऊ लागतो. एकमेकांचा विश्वास कमी होतो. नकारात्मक वातावरण निर्माण होते ते तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मुळीच चांगले नाही.
जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करणे :- पार्टनरला तुमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करणं तुमच्या नात्यासाठी चुकीचे ठरू शकते. कारण प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र अस्तित्व असते. तुमचा जोडीदार जसा आहे त्याला त्याच्या गुण-दोषासह स्वीकारा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही ती त्यांना मोकळ्या मनाने नक्कीच सांगू शकता. मात्र त्यांनी ती तुमच्यासाठी बदलावे हा आग्रह धरू नका. शिवाय तुमच्या जोडीदाराचा आदर तुम्ही करणे फार गरजेचे आहे.
लाईफ पार्टनरचे ऐकूनच न घेणे :- जेव्हा जेव्हा तुमच्या दोघांमध्ये एकाला व्यक्त होण्याची गरज असेल तेव्हा दुसऱ्याने त्याच्यासाठी चांगला श्रोता होणं गरजेचं आहे. या एकाच गोष्टींवर आज अनेक कुटुंब सुखाने संसार करत आहेत. सुखी वैवाहिक जीवनाचं हे एक गुपितच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं म्हणणं कान देऊन ऐकता तेव्हा त्या व्यक्तीला सर्वात आधी मनातून खूप बरं आणि हलकं वाटतं.
शिवाय यामुळे अनेक समस्या सहज सोडवता येऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला थोडासा वेळ देता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील मौल्यवान क्षण आणि तुमचं आयुष्यच त्या व्यक्तीला देत असता. एखाद्या महागड्या भेटवस्तूपेक्षा हे गिफ्ट जोडीदारासाठी नेहमीच गरजेचं असतं.