महिन्याच्या पगारातून करायची असेल पैशांची बचत तर करा ‘या’ 7 ट्रिकचा अवलंब! महिन्याला वाचेल पैसा आणि वाढेल गुंतवणूक

Published by
Ajay Patil

Money Saving Tips:- भविष्यातील आर्थिक सुरक्षितता या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजनाला जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. आपण जीवनामध्ये जो काही पैसा कमवतो त्या पैशांचे योग्य नियोजन करून बचत करणे व त्या केलेल्या बचतीचे चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे खूप गरजेचे असते.

तुमचे महिन्याचे उत्पन्न कमी असो अथवा जास्त असो यामध्ये तुम्हाला आर्थिक नियोजन करणे खूपच गरजेचे आहे. तुम्ही जर नोकरदार व्यक्ती असाल व तुमचा महिन्याला पगार येत असेल तर मात्र याबाबतीत योग्य आर्थिक नियोजन हे खूप महत्त्वाचे होऊन बसते व त्या दृष्टिकोनातून स्वतःला एक आर्थिक शिस्त लावणे देखील तितकेच गरजेचे आहे.

त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा काही सोप्या ट्रिक्स बघणार आहोत ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पगारातून पैसा वाचवू शकाल व त्या पैशांची बचत करून ती बचत गुंतवू शकाल.

या ट्रिक्स वापरा आणि पगारातून पैसा वाचवा

1- महिन्याचा बजेट बनवा आणि त्या बजेटवर परफेक्ट रहा- तुम्हाला जर बचत करायची असेल तर पहिली सुरुवात तुमच्या महिन्याचा पगार आल्यानंतर महिन्याचा जो काही तुमचा बजेट असेल तो बनवण्यापासून होते. यामध्ये तुमचा पगार किती आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या महिन्याचा बजेट तयार करा.

अशाप्रकारे बजेट तयार केल्यामुळे तुम्हाला तुमच्या महिन्याच्या खर्चाचे वर्गीकरण करता येईल. म्हणजेच तुमचे भाडे असेल किंवा विज बिल असेल किराणा सामान आणि मनोरंजन इत्यादी गोष्टींकरिता तुम्हाला किती पैसा लागणार आहे याचा बजेट बनवणे गरजेचे आहे.

कारण जेव्हा तुमचा महिन्याचा बजेट किती आहे हे जेव्हा तुम्हाला क्लिअर होईल तेव्हा तुम्ही जास्त खर्च कुठे करत आहात हे तुम्हाला कळायला मदत होईल. त्यामुळे महिन्याचा बजेट तयार केल्यावर त्याचे काटेकोरपणे पालन करणे खूप गरजेचे आहे व अनावश्यक खर्च कमी करावा.

2- अगोदर महिन्याची बचत बाजूला करा- ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. यामध्ये तुमच्या पगारातून तुम्ही बचती करिता काही भाग बाजूला काढणे गरजेचे आहे. ते तुम्ही तुमच्या एकूण पगाराच्या दहा किंवा 20 टक्क्यांपर्यंत पैसे बाजूला काढू शकतात.

अशाप्रकारे पैसे बाजूला काढल्यानंतर तुमचे दुसरे बँक खाते असेल तर त्याच्यामध्ये ते बचतीचे पैसे ट्रान्सफर करावेत व या पैशाचा वापर तुम्ही एखाद्या वेळेस इमर्जन्सीमध्ये किंवा गुंतवणुकीसाठी वापरू शकतात.

3- स्वयंचलित बचत- हा एक खूप बचतीसाठीचा उत्तम असा पर्याय आहे. बऱ्याचदा प्रत्येक महिन्याला आपल्याला ज्या पैशांची बचत करायची आहे तो पैसा बाजूला काढायला काहीजण विसरतात. यावर उपाय म्हणून अनेक बँका आणि वित्तीय ॲप्स अशा प्रकारची सुविधा देतात ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पगारातून काही रक्कम थेट तुमच्या बचत खात्यात ऑटोमॅटिक ट्रान्सफर करू शकतात.

यामध्ये तुम्हाला बचतीकरता पैशाचा जो भाग वेगळा काढणार आहात तो काढण्याची गरज पडत नाही व अकाउंट मधून ऑटोमॅटिक ज्या बचत खात्यात पैसे ट्रान्सफर होतात.

4- अनावश्यक खर्च करणे टाळा- प्रत्येक महिन्याला होणाऱ्या अनावश्यक खर्चाकडे लक्ष द्या आणि त्यामध्ये शक्य तितकी कपात करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर महिन्यामध्ये बाहेर जेवायला जायची आवड असेल तर हे प्रमाण जरा कमी करा. एवढेच नाही तर ऑनलाईन खरेदी करताना हुशारीने खर्च करा आणि जे आवश्यक आहे त्याच गोष्टींची खरेदी करा.

तुमचा जर महिन्याला मनोरंजनावर जास्त खर्च होत असेल तर त्या खर्चात कपात करा व त्या ऐवजी विनामूल्य किंवा स्वस्त अशा मनोरंजन पर्यायाचा शोध घ्या. हे पर्याय छोटे जरी असले तरी देखील तुमच्या बजेटसाठी ते खूप फायद्याचे ठरतील.

5- आपत्कालीन निधी तयार करण्याची खात्री करा- आपत्कालीन निधी करिता बचतीचा काही भाग बाजूला ठेवणे खूप गरजेचे आहे. अशाप्रकारे तुमचा जर आपत्कालीन निधी तयार असेल तर अचानकपणे उद्भवणाऱ्या अनपेक्षित खर्चासाठी तुम्ही तयार राहतात.उदाहरणार्थ वैद्यकीय खर्च, तुमची नोकरी गेली किंवा इतर अनपेक्षित परिस्थितीत अशा प्रकारचा आपत्कालीन निधी तुम्हाला कामात येतो.

आपत्कालीन निधी तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुमच्या तीन ते सहा महिन्याच्या पगाराच्या बरोबरीचा आपत्कालीन निधी तयार असावा आणि आपत्कालीन निधीसाठीचे पैसे अशा खात्यामध्ये ठेवावे ज्या ठिकाणाहून तुम्ही इमर्जन्सीमध्ये पैसे सहजरित्या काढू शकाल. परंतु नियमित खर्च करिता आपत्कालीन निधीतून पैसा काढू नका.

6- म्युच्युअल फंड किंवा एसआयपीमध्ये गुंतवणूक करा– फक्त बचत खात्यात पैसे ठेवण्याऐवजी तुमची बचत म्युच्युअल फंड किंवा एसआयपी सारख्या पर्यायांमध्ये गुंतवा. एसआयपी हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे व यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकतात.

हा पर्याय तुमचा पैसा वाढवण्यास मदत करत नाही तर दीर्घ मुदतीत चांगला परतावा देखील देतो. या माध्यमातून तुम्ही तुमची बचत वाढवू शकतात आणि त्याच वेळी तुमच्या पैशांवरील महागाईचा प्रभाव देखील कमी होण्यास मदत होते.

7- छोट्या बचतीपासून सुरुवात करा- बचत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही लहान ध्येय निश्चित करा. समजा तुमचे ध्येय जर मोठे असेल तर लहान भागांमध्ये त्याची विभागणी करा.

समजा तुम्हाला एक वर्षात एक लाख रुपये वाचवायचे असतील तर दर महिन्याला आठ हजार तीनशे तेहतीस रुपयांच्या छोट्या लक्षामध्ये ते विभागून घ्या. कारण ध्येय छोटे असेल तर ते प्राप्त करणे किंवा साध्य करणे सोपे असते.

Ajay Patil