अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अनेक संकटाना तोंड देत जगाचा पोशिंदा आपली शेती पिकवतो, मात्र आता याच बळीराजाला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने थेट टोकाचे पाऊल उचलले आहे. बापू दादा चव्हाण या शेतकऱ्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
चव्हाण हे कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे राहत आहे. दरम्यान जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्याच्या गळतीचे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते.
गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याचे स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा इशारा देणारा व्हिडिओ केला असून तो व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्यात तळे साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत.
त्यातून लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. पीक घेता येत नसल्याने उत्पनाविना कर्जबाजारी झालो आहे. ‘शिर्डीजवळ चारीत बिघाड झाला आहे.
आपण तो अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात नाही. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.