अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी शहरातील विनापरवाना बांधकामे व गेल्या तीन वषांर्तील बांधकामांना दिलेल्या परवानग्या आणि नगरपरिषदेने बांधकाम पूर्णत्वाचे दिलेल्या दाखल्यांची चौकशी करण्यासाठी सरकारी सदस्यांची समिती नेमून चौकशी करावी व दोषींविरुद्ध करावाई करावी, असा महत्वपूर्ण ठराव नगपालिकेने गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला आहे.
पालिकेच्या आयोजित सभेत या वेळी सत्ताधारीच आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले. मुख्याधिकारी व पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनीच कामात अडचणी आणल्याचे सांगून पालिकेने दिलेले गाळे परस्पर मूळ मालकाकडून दुसऱ्याच्या नावे करून देण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमावी व चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, असा ठरावही करण्यात आला आहे.
शहरात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी सहा ते सात ठिकाणी पाण्याचे एटीएम बसविण्याचा निर्णय पालिकेने केला आहे. शहरातील अवैध बांधकामांना परवानगी देणे, भूमिअभिलेख कार्यालयात नोंद नसताना परवानगी देणे, बांधकाम पूर्णत्वाचा दाखल देणे, विनापरवाना बांधकाम सुरू असताना त्यांच्यावर कारवाई न करणे, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमून चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, असा ठराव पालिकेने केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध असे ठराव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालिकेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कामाबाबतचा अभिप्राय लिहून त्याची प्रतिक्रिया देण्यासाठी लिखित स्वरुपात फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. हे अभिप्राय जिल्हाधिकारी पाहणार असल्याने आता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे