अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- भाडेकरुकडून जागा खाली करुन घेण्यासाठी संचारबंदीतही शहरात बेकायदेशीर रित्या दुकानांची मोडतोड करणारे समाजकंटक व गाळेधारकांविरुध्द खोटी माहिती पसरवून शांतता भंग करणार्या विश्वस्तांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिठा मस्जिदच्या भाडेकरुंनी केली आहे.
या मागणीसाठी भाडेकरुंनी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन दिले. तर दुकानांना संरक्षण देण्याची मागणी देखील केली. यावेळी इमरान शेख, मोहम्मद इस्माईल शेख, मोहम्मद अली शेख, मुजम्मिल शेख, युसुफ शेख, इमरान शेख, मोहम्मद हनिफ शेख, अब्दुल रहीम शेख आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी व संचारबंदीत सर्व बाजारपेठा बंद आहेत. या संधीचा फायदा घेऊन रिठा मस्जिदच्या विश्वस्तांनी खोटी माहिती प्रसारित करुन, काही गुंडांच्या मदतीने जागा खाली करुन घेण्यासाठी त्यांच्या दुकानांची मोडतोड केली असल्याचा आरोप भाडेकरुंनी केला आहे.
रिठा मशिदीचे विश्वस्तांनी भाडेकरु विरोधात लाखो रुपये थकविल्याचे चुकीची माहिती प्रसारित करुन समाजात त्यांची बदनामी चालवली आहे. वस्तुस्थितीत ट्रस्ट व भाडेकरी यांच्या दरम्यान गेली 13 वर्षापासून न्यायालयात वाद सुरू आहे.
भाडेकरूंनी सदर जागा खाली करावी यासाठी विश्वस्तांनी दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल भाडेकरुंच्या बाजूने लागला आहे. विश्वस्तांचा दावा फेटाळण्यात आल्याने कोर्टात 13 वर्षाची भाडे रक्कम ट्रस्टींनी काढून घ्यावी असे न्यायालयाने आदेश दिले.
याबाबत आज पर्यंत 13 वर्षाचे भाडे न्यायालयात जमा आहे. ते अद्यापही ट्रस्टींनी काढलेले नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मशिदचे विश्वस्त भाडेकरु विरोधात लोकांना चिथावणी देऊन त्यांच्या भावना भडकवीत आहेत.
विश्वस्तांनी जाणून-बुजून महापालिकेचे वीस वर्षापासूनची मालमत्ता कर 8 लाख 70 हजार रुपये भरले नव्हते. 2020 मध्ये महापालिकेने शास्ती माफी दिली होती. यावेळी कर भरला असता तर 4 लाख रुपयांची माफी मिळाली असती.
सदर कर भाडेकरु देण्यास तयार असताना देखील विश्वस्तांनी हलगर्जीपणा केल्यामुळे कर भरण्यात आला नाही. शेवटी महापालिकेचे कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी जप्ती कारवाई करण्यासाठी आल्याने विश्वस्तांनी कर भरणार नसल्याचे स्पष्ट करुन सदर दुकाने सील करण्याचे सांगितले.
मात्र भाडेकरुंनी एकत्र येऊन आपल्या वाट्याची थकबाकी भरुन हे प्रकरण थांबवले. तरी देखील विश्वस्तांनी सदर जागा खाली करण्यासाठी त्यांना सूडबुद्धीने त्रास व धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपुर्वी संचारबंदी असताना देखील दुकानांसमोर मोठा जमाव करुन सात दुकानांचे फलक, ओटे, पडव्या, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचे नुकसान करुन अक्षरश: हैदोस घालण्यात आला. सदर प्रकरणी गाळेधारकांनी विश्वस्तांविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार केली आहे.
याचा राग येऊन विश्वस्तांनी धमक्या देऊन समाजात चुकीची माहिती पसरविण्याचे काम सुरु केले असल्याचे निवेदनात तक्रारदार गाळेधारकांनी म्हंटले आहे.