अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- राज्यात नावलौकिक असलेल्या व महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याकडून अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेच्या संचालक मंडळासह सचिव,व्यवस्थापक व बॕक अधिकाऱ्यांना सहाय्यक निबंधकांनी नोटीस बजावली आहे.
अशी माहिती नागवडे कारखान्याचे संचालक राकेश कैलास पाचपुते व प्रा. सुनिल माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती अशी, काष्टी सेवा संस्थेमध्ये मागील पाच वर्षात कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जवाटप करणे,
संस्थेच्या १२८ सभासदांना २ कोटी २१ लाख ७८ हजार ५०० रुपये इतक्या रक्कमेचे संस्थेने नियमबाह्य कर्जवाटप केलेले चौकशीत उघड झाले आहे. यामध्ये संस्थेचे आजी माजी पदाधिकारी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नियमबाह्य कर्ज वितरण झाले आहे.
अगदी दैनंदिन कामकाजावर ज्याचे बारकाईने लक्ष असते ते भगवानराव पाचपुते यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगी, पुतण्या, भावजई यांनाही नियमबाह्य कर्ज दिल्याचे धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे.
१२८ पैकी ९५ सभासदांच्या नावाने कर्जमाफीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले. त्यामध्ये ज्या सभासदांना नियमबाह्य कर्जे दिली त्यांना कर्जमाफी मिळवून देत शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
चौकशी अहवालामध्ये नमुद केलेल्या निष्कर्षानुसार सर्वच मुद्द्यवर संस्था संचालक मंडळ, सचिव,व्यवस्थापक, हे दोषी असल्याचे सहकार खात्याकडून सुचित करण्यात येऊन १९९६ पासून २०२० पर्यत चोवीस वर्षे एकाच जागेवर सचिव म्हणून काम पहाणारा एस.बी.बुलाखे यांना जिल्हा उपनिबंधक यांनी गैरकारभाराबद्दल निलंबित करुन चौकशी अधिकारी
म्हणून जामखेड येथील देवीदास घोडेचोर याची नियुक्ती केल्याचे सांगितले. राकेश पाचपुते व सुनिल माने यांनी सहकार खात्याकडे चौकशीची मागणी केली होती.
यामुळे संस्थेचा गैरकारभार समोर आला आहे. दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सहकार खात्याने सुरु केली असल्याची माहिती पाचपुते व माने यांनी सांगितले.