IMD Alert : उन्हाळ्याच्या दिवस सुरु असतानाही देशातील अनेक ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
असे असतानाही अजूनही देशातील काही भागात पाऊस पडत आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा. दरम्यान जाणून घेऊयात कोणत्या राज्यात पाऊस पडणार आहे.
दिल्ली
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिवसभर दिल्लीचे हवामान स्वच्छ राहणार आहे. दिल्लीचे किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहणार आहे. दिवसभरात काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता वर्तवली आहे. येथील नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार नसला तरीही 27 एप्रिलनंतर तापमानात झपाट्याने वाढ होऊ शकते.
या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस
येत्या काही दिवसांत पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाट, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ तसेच माहे येथे पुढील 4 दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
24 एप्रिल रोजी केरळ आणि माहेमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर पुढील 5 दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि 26 आणि 27 एप्रिल रोजी गुजरातमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल. तर वायव्य भारतात, पश्चिम राजस्थान वगळता संपूर्ण प्रदेशात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल.
राजस्थानमध्ये जाणवणार उष्णतेचा प्रभाव
सध्या राजस्थानमध्ये उष्णतेचा प्रभाव सतत वाढत आहे. त्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रस्थानामुळे मागील आठवड्यापासून राज्यात कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात उन्हाळ्याची स्थितीही अशीच राहील. मात्र, 25 एप्रिलपर्यंत हवामानात बदल होईल. तसेच आज रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल.
उत्तराखंडमध्ये होणार हवामानात बदल
उत्तराखंडमधील 5 जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होऊ शकतो. हवामान खात्याकडून उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्यांच्या उंच भागात हलका पाऊस तसेच हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 26 एप्रिलपर्यंत हवामानात बदल दिसून येणार आहे.
या ठिकाणी पडणार गारा
हवामान विभागाकडून 23 ते 25 एप्रिल दरम्यान उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वेगळ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज रोजी ओडिशा, बिहार आणि छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी गारपीट होईल.
आज आणि उद्या विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल. दक्षिण भारतात, आज तटीय आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते. तसेच हवामान विभागाकडून 26 ते 27 एप्रिल दरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.