IMD Rain Alert : राज्यात परतीचा पाऊस (Rain) पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. परतीचा पाऊस निरोप घेताना राज्यात पुन्हा एकदा जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा परतीचा पाऊस 10-11 दिवसांचा विलंब झाला आहे. साधारणपणे ३ ते ४ ऑक्टोबरपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो, मात्र यंदा पावसाने १४ ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास सुरू केला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील 90 टक्के भागात 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस थांबेल, तर उर्वरित 10 टक्के भागात 22 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल.
मध्य महाराष्ट्र (Maharashtra), मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही पावसाची शक्यता आहे. पुणे शहर आणि लगतच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
येत्या तीन ते चार दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यातून पावसाचे पुनरागमन होईल, असे विभागाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, तूर, कापूस, मका, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पाऊस आणखी दिवस थांबला तर उरलेले पीकही उद्ध्वस्त होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
महाराष्ट्रात पावसाळा सुरूच आहे. संततधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. पुण्यात (Pune) शुक्रवारी काही तासांच्या मुसळधार पावसाने लोकांच्या आव्हानांमध्ये अनेक पटींनी वाढ केली आहे.
हवामान खात्याचा इशारा
तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे येथे १७ ऑक्टोबरपर्यंत गडगडाटी वादळ आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
याशिवाय 15 आणि 17 ऑक्टोबर रोजी दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि किनारी कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अंदमानमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. निकोबार बेटांवर 15 आणि 17 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.