अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-गेल्या तीन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पढेगाव भागातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
सध्या भागातील गहू, हरभरा काढण्याचे काम सुरू असून हजारो क्षेत्रावर कांदा पिक शेतात उभे आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याबरोबरच मका, घास, ऊस आदी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शनिवारपासून वातावरणात अचानक बदल झाला असून संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पढेगावसह परिसरात पाऊस झाला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले.
तसेच दुसऱ्या दिवशीही संध्याकाळी अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची अक्षरश: मोठी धांदल उडाली.
सध्या परिसरात गहू काढण्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी गहू तसेच शेतात उभी असणारे पिके यांचे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे गव्हाच्या पीकाची पडझड झाली आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह डाळिंब बागेचेही या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा काढणीचे काम सध्या सुरू असल्याने काढलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी याच महिन्यात अवकाळीच्या तडाख्याने कांदा पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीही झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शेतातील उभ्या पिकांची शेतकऱ्यांना मोठी आशा असते. वर्षभराचे नियोजन यावर अवलंबून असते. परंतू, अशा बिगर मोसमी वादळी पावसाने शेतकरी, शेतमजूर धास्तावले आहेत.
त्यामुळे या भागातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरीत करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.