गळती थांबवण्यासाठी ‘ऑक्सिजन नर्स’ ही संकल्पना राबवू : आरोग्यमंत्री टोपे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना सर्व रूग्णालयांना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची गळती वा इतर लॉस थांबवण्यासाठी ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजच्या तारखेला 1715 मे. टन ऑक्सिजनची गरज आहे. तितका ऑक्सिजन पुरवठा होत असल्याचे टोपे म्हणाले. राज्यातील लॉकडाउन 15 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात लागू करण्यात आलेले निर्बंध कठोरपणे पाळण्यात यावेत अशा सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी केले. रेमडेसीवीरचा देखील योग्य वापर करण्यास सांगण्यात आले आहे. पण अनावश्यक वापर निश्चित टाळला पाहिजे.

ज्या छोटय़ा शहरांत मोठय़ा आरोग्यसुविधा नाहीत तिथे टेलिमेडिसीन सुविधा सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे असेही टोपे म्हणाले.

राज्यात 1 मे पासून लसीकरणाची घोषणा करण्यात आली असली तरी लसींचा तुटवडा जाणवत आहे.

कोव्हीशिल्डने केवळ 3 लाख लसींची पर्चेस ऑर्डर दिली आहे.आम्हाला 12 कोटी लसींची गरज आहे.त्यासाठीचे पैसे एका चेकद्वारे देण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शवली आहे. केंद्र सरकारकडे वारंवार हा विषय मांडण्यात आला आहे.

कदाचित केंद्र सरकारकडेच लस उपलब्ध नसण्याची शक्यता असू शकेल. पण राज्यातील भाजपाच्या नेत्यांनाही आपले आवाहन आहे की सगळे एकत्र येउन आपण केंद्र सरकारकडे ही मागणी मांडू असेही राजेश टोपे म्हणाले.

एकत्रित 20 ते 25 लाख लसी जेव्हा राज्य सरकारला उपलब्ध होतील तेव्हा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करू असेही ते म्हणाले. 18 वर्षांपासून पुढील वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येणार असली तरी त्यातही प्राथमिकता ठरविण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24