अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन व्हाव्यात अशी शिक्षक संघटनांची मागणी होती. त्यामुळे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन केल्या.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नगरपरिषद व महापालिकांमध्ये बदलीने जाता यावे, यासाठीही शिक्षक सहकार संघटनेने लढा सुरू केला होता.
ग्रामविकास विभागाने जून 2017 ला शासन निर्णय काढून जिल्हा परिषद शिक्षक नगरपरिषदेमध्ये बदलीने जाऊ शकतात, असे स्पष्ट केले.
त्यानंतर नगरपरिषद व महापालिकेच्या शिक्षकांना सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये बदलून जाता यावे किंवा त्यांची सेवा वर्ग व्हावी, अशी मागणी पुढे आली.
यासाठी शिक्षक संघटना आग्रही होत्या. याची दखल घेत शासनाने 16 फेब्रुवारी आदेश काढून महापालिका नगरपरिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना जिल्हा परिषद व इतर नगरपरिषद,
महापालिकेमध्ये जिल्हा बदलीने जाता येते, असे जाहीर केले. या नवीन धोरणात संबंधीत शिक्षकांना संबंधित दोन्ही नियुक्ती प्राधिकार्यांची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे.
यासह मूळ नियुक्तीच्या ठिकाणी असलेली सेवा ज्येष्ठता बदलीच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी गमवावी लागेल. नवीन ठिकाणी त्यांची ज्येष्ठता कनिष्ठ राहील.