अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- यंदा राज्यात मान्सूनचा हंगाम दणक्यात सुरु झाला असली तरी शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.
त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. दररोज पडणारे कडक उन आणि वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे जमिनीची ओल कमी होत आहे.
त्यामुळे जमिनीत पेरलेले बियाणे उगवते का नाही अशी चिंता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना सतावत असतानाच पेरणीला उशीर होत असल्याने पेरणी न केलेले शेतकरीही धास्तावले आहेत काही ठिकाणी हलका पाऊस पडत असला तरी तो पेरणीसाठी उपयोगी नाही.
येत्या आठ दिवसात पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी करु नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पुढील आठ दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यात 14 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर 35 तालुक्यात 50 टक्केपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच 232 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. मात्र, राज्यात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.
येत्या आठ दिवसात पाऊस कमी पडणार आहे. 80 मिमी ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहे. खरीपाची पेरणी-27 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. मात्र, पुढील आठ दिवस पावसाची शक्यता कमी आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही परत आवाहन करतो की आठ दिवसात पाऊस कमी आहे. काळजीपूर्वक पेरणी करावी अशी विनंती आणि आवाहन करत आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तर चाळीस टक्के शेतकरी अजून पुरेशी ओल नसल्याने थांबले आहेत. पेरणी झालेल्या आणि पेरणी न झालेल्या दोन्ही क्षेत्रांना पावसाची नितांत गरज असताना दररोज कडक उन व जोरदार वारे वाहत आहे.
त्यामुळे कशी बशी ओल टिकवून ठेवलेली राने आता कोरडी पडू लागली आहेत. एकीकडे बियाण्याच्या तुटवड्याचा सामना करीत पेरणी केलेले क्षेत्र आता पावसाच्या दडीमुळे संकटात आले आहे.