अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणार्या मेन व्हॉल्व दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार आहे.
या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारपासून (ता.17) शहराला होणारा दैनंदिन पाणी पुरवठा एक दिवसाआड व कमी दाबाने करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली आहे.
निळवंडे धरणातून पाईप लाईनद्वारे संगमनेर शहराला करण्यात येणार्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य व्हॉल्व नादुरुस्त असल्याने सदर व्हॉल्वच्या दुरुस्तीसाठी किमान एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यानच्या कालावधीत निळवंडे धरणातून संगमनेर शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. शनिवारपासून संगमनेर शहर व उपनगरात एकवेळ व एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल.
तरी शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणीसाठा योग्य प्रमाणात करावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच आपल्या नळास तोट्या बसवून घ्याव्यात. जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही.
रस्त्यावर पाण्याचा सडा मारू नये. याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी व पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, पाणी पुरवठा समिती सभापती मालती डाके, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.