अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- राज्यभर पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या पावसाने आता जोर धरला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळणार आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नगर जिल्ह्यात ६, ७ आणि ८ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती ओढावली आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली, यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेल्या या मुसळधार पावसाचा फटका बसणार असल्याची चिन्हे आहेत.
यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
नदी, ओढे, नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. तसेच पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून दूर जावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल शक्यतो ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. धोकादायक इमारतीमध्ये आश्रय टाळावा.
घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे. धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनास जाणे टाळावे. नदीच्या प्रवाहात उतरू नये. मेघगर्जना सुरू असताना झाडांच्या खाली थांबू नये. सर्व प्रकारचे विद्युत खांब, रोहित्रापासून दूर राहण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ टक्के पाऊस झाला आहे.