अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- राज्यात सुरू असलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यापारी वर्गांकडून विरोध होत असतानाच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण लाॅकडाऊनचे शुक्रवारी संकेत दिले आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात एकवाक्यता व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा समोर आला. तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल दरम्यान ‘आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल.
प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही,’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे वीकेंडप्रमाणेच आता संपूर्ण आठवडाभर देखील कडक लॉकडाऊन केला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ‘
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल,’ असंही अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
अजित पवार यांनी आजच्या बैठकीत इंजेक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. तसंच बारामतीत होत असलेली रुग्णवाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.