अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नुकत्याच कोरोनासंदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार साई मंदिर दर्शनासाठी आता भाविकांना समाधी मंदिर सकाळी ७. १५ ते संध्याकाळी ७. ४५ यावेळेत खुले राहणार आहे. तसेच सकाळी १० ते रात्री ७.३० यावेळेत श्री साईप्रसादालय हे सुरु राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानाने दिली आहे.
राज्य सरकारच्या १४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या आदेशानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी १६ नोव्हेंबरपासून अटी शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी होवू नये म्हणून संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.
त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते संध्याकाळी ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे. रात्री १०.३० ला होणारी श्रींची शेजारती आणि पहाटे ४. ३० वाजताची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल.
परंतु याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी १० ते रात्री७. ३० यावेळेत भाविकांकरिता सुरु असणार आहे.