अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- यंदा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात वेळेअगोदर सुरु झाला, जून महिन्यात सुरुवातीच्या पंधरावड्यात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र, नंतर पावसानं दडी मारलीय. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर पेरणी देखील केली होती.
मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यात मान्सून 8 ते 9 जुलै नंतर सक्रिय होऊ शकतो, असं देखील सांगितलं आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन येत्या पावसात राज्यातील पावसाची स्थिती काय राहणार याविषयी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे.
या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.हवामान विभागानं राज्यातील काही भागात 7 आणि 8 जुलैला पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे.
त्याअंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा,
गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.