अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच राज्यात नाईट कर्फ्यूही लावण्यात आला. यामुळे राज्यातील मंदिरात पूर्वीप्रमाणे गर्दी दिसून येत नसून भाविकांविना जिल्ह्यातील महत्वाची तीर्थक्षेत्रे असलेली शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थान ओस पडली आहे.
करोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्यानंतर मधल्या काळात शिर्डी व शनिशिंगणापूर येथे होऊ लागलेली भाविकांची गर्दी पुन्हा घटली आहे. शिर्डीत दिवसभरात सहा ते सात हजार तर शनिशिंगणापूरला पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात येते.
करोनाची साथ येण्यापूर्वी शिर्डीत लाखो भाविक येत असत. गेल्यावर्षी करोनाच्या सूरवातीलाच मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत सर्वांत उशिरा मंदीरे खुले करण्यात आली.
अनेक बंधने घालून दर्शन व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे बंद पडलेले व्यावसाय पुन्हा सुरू झाले होते. या काळात शिर्डीत सुरवातीला दररोज पंधरा हजार तर अलीकडेच तीस हजार भाविक प्रतिदिन दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अनलॉकनंतरच्या सुरवातीच्या काळात गर्दी रोखण्याचे आव्हान होते. आता मात्र, करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यापासून भाविकांची संख्या आपोआप घटली आहे. याचा परिणाम शिर्डीतील सर्व प्रकारच्या व्यावसायांवर झाला आहे.
सतत गजबलेला दर्शनमार्ग, मंदीर परिसर, रस्ते पुन्हा ओस पडलेले दिसत आहेत. शनिशिंगणापूरलाही गर्दी ओसरली आहे.
तेथेही दररोज केवळ पाचशे ते सातशे भाविक येत असल्याचे सांगण्यात आले. तेथेही मंदिरावर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे व्यावसायही अडचणीत आले आहेत.