अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

नाईट कर्फ्यूचा निर्णय झालेला नाही. रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर पुन्हा टाळेबंदी होणार का? किंवा रात्रीची संचारबंदी लागू होणार का? यावर तर्क-वितर्क केले जात आहेत. परंतू राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळून लावली आहे. दरम्यान निर्बंध शिथिल करण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत.

त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होत. ‘हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे,

आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.

लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. असे आवाहन ठाकरे यांनी केले होते.