‘ 6 ते 8 आठवड्यात येणारी तिसरी लाट रोखणं अशक्य’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-  कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. ही लाट रोखणं अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलेरिया म्हणाले, आपण अनलॉक करायला सुरुवात केली आहे. मात्र, पुन्हा एकदा कोविड प्रोटोकॉलची कमतरता भासत आहे. देशातील जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करून हे मोठं आव्हान आहे.

कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या दोन लसींच्या दरम्यान गॅप वाढवण्यात आला आहे. ते चुकीचं नाही. उलट त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येणार आहे, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं. पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान जे झालं त्यातून आपण अजूनही धडा घेतलेला नाहीये.

पुन्हा गर्दी वाढत असून लोक जमायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोनाची संख्या वाढण्यास वेळे लागेल. येत्या सहा ते आठ आठवड्यात हे होऊ शकतं किंवा त्याला विलंब होईल, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.

आपण कोविड प्रोटोकॉलचं पालन कसं करतो आणि गर्दीवर नियंत्रण कसं आणतो, यावर बरंच अवलंबून आहे. आतापर्यंत देशाच्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोकांनाच दोन डोस मिळाले आहेत. त्यामुळे वर्षअखेरीस 108 कोटी लोकांना लस देण्याचं आव्हान सरकार समोर आहे.

हेच मोठं आव्हान आहे, असं त्यांनी सांगितलं. नवी लाट साधारणपणे तीन महिन्यासाठी असेल. मात्र, वेगवेगळ्या फॅक्टर्सनुसार हा कालावधी कमीही असू शकतो. कोरोना नियमांचं पालन करणं सक्तीचं आहेच. पण सावध राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

मागच्या वेळी आपण नवा व्हेरिएंट पाहिला. बाहेरून आलेला हा व्हेरिएंट आपल्याकडे विकसित झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

अहमदनगर लाईव्ह 24