अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय लघु सुक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे, असे भाकीत जयपूर येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून दुपारी प्रफुल्ल पटेल हे सोबतच दिल्ली गाठल्याचा संदर्भ होता.
तर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सकाळीच दिल्लीत पोहोचले होते त्यामुळे राणे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. दरम्यान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल भेट घेतली.
त्यानंतर भाजप मुख्यालयात चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत भेट घेवून संघटनात्मक बाबीवर चर्चा केली आहे. सूत्रांकडूनअशी देखील माहिती देण्यात येत आहे की, शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली.
त्यामुळे राणे यांच्या भाकितानंतर राजकीय वर्तुळात गरमा गरम चर्चा सुरू आहेत. अनेक शक्यता आणि तर्क व्यक्त केले जात आहेत. असे असले तरी नारायण राणेंच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मलिक म्हणाले की, सरकार पडेल ही भविष्यवाणी करुन देवेंद्र फडणवीस थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटीलही बोलायचे. आता नारायण राणे यांनी भविष्यवाणीचे टेंडर घेतले असावे. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावे लागत, असावे असे नवाब मलिक म्हणाले.