अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाचे काम ठेकेदारामुळे रेंगाळल्याने मार्गाच्या ठिकाणी एकाच पाऊसात पाणी साठले आहे. सदर ठिकाणी त्वरित पाणी निचरा होण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे काम पूर्ण नसताना २७ एप्रिल २०२१ पासून कायमस्वरूपी रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. याबाबत तीव्र स्वरुपाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुचाकी वाहनांसाठी एक लेन तयार करून दिली होती.
त्यानंतर माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे यांनी १४ गावांमधील नागरिकांसह पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या पुतळया समोर १ मे रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने व रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाची एक बाजू सर्व वाहनांसाठी खुली करून दिली होती.
मात्र त्यानंतर सुमारे दिड महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी देखील या ठिकाणी पावसामुळे जमा होणारे पाणी नदीला सोडून देता येईल अशी व्यवस्था केली नाही की उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी देखील प्रयत्न केले नाहीत.
त्यामुळे आता एकाच पावसामुळे भुयारी मार्गाच्या ठिकाणी पाणी साठले आहे. पाऊसाच्या पाण्यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर ठिकाणी त्वरीत पाण्याचा निचरा होईल,अशी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.