चक्क ‘या’ तालुक्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात आक्रोश मोर्चा निघणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- दलित कुटुंबियावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व आरोपींना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यास निलंबित करावे,

या मागणीसाठी उद्या शुक्रवार दि.25 जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान या निवेदनात म्हंटले आहे कि, राहुरी तालुक्यातील खडांबे गावातील बाळासाहेब लटके या राजकीय पुढार्‍याकडून दलित कुटुंबावर अमानुषपणे अत्याचार झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रत्यक्षात या कुटुंबाला भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेले.

तिथे गेल्यावर कुटुंबातील व्यक्तींनी घडलेली घटना कार्यकर्त्यांना सांगितली. गावातील खाणीतून अमोल साळवे व त्याची काकू यांनी त्यांच्या घरच्या गाया पाणी पाजून आणल्या.

ही गोष्ट लटके व त्यांच्या घरातील लोकांना समजल्यामुळे त्यांनी साळवे कुटुंबियांना जबर मारहाण केली.

एवढी मोठी घटना घडलेली असताना देखील राहुरीचे पोलीस यांनी या घटनेकडे राजकीय पुढार्‍याच्या दबावापोटी कानाडोळा करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लटके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात येत नाही व आरोपींना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर केली म्हणून राहुरीचे पीआय दुधाळ यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना निलंबित केले जात नाही,

तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही व येत्या 25 तारखेला राहुरीचे पीआय दुधाळ यांच्यावर कारवाई होण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24