file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात वेगवगेळ्या ठिकाणी बिबट्याकडून हल्ला झाल्याच्या घटना घडत असतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच आता बिबट्याने श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे धुमाकूळ घातला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे बिबट्याने गेल्या आठवडाभरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. चार दिवसांत बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन शेळ्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे नागरिकांसह पशुपालकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील विसापूर जलाशयाचे पाणी व लपण्यासाठी उसाचे क्षेत्र यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विसापूर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वी शिंदे मळा शिवारात बिबट्या आढळून येते होता. त्या ठिकाणी रानडुक्करांची व कुत्र्यांची संख्या कमी झाली.

बिबट्यापासून संरक्षणासाठी बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे गोठ्याला जाळी ठोकून घेतली. त्यामुळे त्या ठिकाणी वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाले.

परंतु, बिबट्याचा वावर कमी झाला नाही.गेल्या चार दिवसात बिबट्याने संबंधित परिसरातील दोन शेळ्यांचा फडशा पडला आहे. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असून त्यांनी ठिकाणी पंचनामा केला आहे.