अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- महाराष्ट्रातील विविध भागात खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या.
त्यातच आता पुण्यातून विविध भागातील खाजगी रुग्णालयांनी अवघ्या दोन आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांची तब्बल १३ कोटी रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती तपासणीत समोर आली आहे.
ही माहिती उघड झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले असून, रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी राज्य सरकारने तपासणी पथक नेमले आहे.
या तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत रुग्णांकडून देयकापोटी अधिकची १३ कोटी रुपये रक्कम खाजगी रुग्णालयांनी वसूल केल्याने ही जास्तीची रक्कम त्या खासगी रुग्णालयांनी तात्काळ संबंधित रुग्णांना परत करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
त्यामुळे ज्या नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत आणि या दरम्यान त्यांची फसवणूक झाली आहे. अशा रुग्णांना आता त्यांचे अतिरिक्त गेलेेले पैसे परत मिळणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आला होता. मात्र अनेक खाजगी रुग्णालयांनी अवाजवी दर लावून कोरोना रुग्णांची लूट केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.