अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.
कायद्याचा धाक उरला नसल्याने चोरट्यांनी देखील हिंमत वाढली असून एकच रात्री अनेक ठिकाणी चोरटे अगदी पद्धतशीरपणे हात साफ करत आहे.
नुकतेची अशीच एक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथील आगवण स्थळ येथे मनोज पवार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
मनोज पवार यांच्या आई घरी झोपलेल्या होत्या. चोरट्यांनी एका दाराची कडी बाहेरून लावून दुसऱ्या दारातून घरात प्रवेश केला. कपाटाची व इतर साहित्याची मोडतोड केली.
कपाटातील गंठण, डोरले आदी दागिने लंपास केले. काही वेळानंतर त्या जाग्या झाल्या. घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दरवाजा बाहेरून बंद केल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळेस त्यांनी आरडाओरड केली. आसपासचे लोक जमा झाल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी एवढ्यावर न थांबता जाताना कुंडलिक झेंडे यांचे घर फोडले.
त्यांच्या घरातून दहा हजार रुपयांची रोकड, पैंजण व चेक चोरट्यांनी लंपास केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.