अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय सुरु करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयात विद्यार्थिनीना उपस्थित राहता येणार नसल्याने दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव होणार नसला तरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इयत्ता अकरावी विद्यार्थीनींचा ऑनलाइन स्वागत समारंभ आयोजित करुन तो संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष डॉ. माधव सरोदे यांनी पालक व विद्यार्थिनींचे स्वागत करून शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देऊन महाविद्यालयाच्या भावी उपक्रमाबाबत माहिती दिली. अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण होत आली आहे.
अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी दीर्घकाळ शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर असल्याने त्यांचे अजून शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी अकरावीचे ऑनलाइन वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याचे सुचविले होते.
कोरोनामुळे अकरावी प्रवेशाचे बहुतेक काम ऑनलाइन अथवा पालकांनी केले असल्याने अनेक मुलींनी महाविद्यालय सुद्धा पाहिले नव्हते. त्यामुळे महाविद्यालयाने ऑनलाइन स्वागत समारंभाचे आयोजन करताना विद्यार्थिनी व पालकांना महाविद्यालय परिसराची व भौतिक सुविधांची माहिती व्हिडीओ चित्रणाद्वारे दाखविण्यात आली.
याप्रसंगी झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. दशरथ शेळके यांनी केले. प्रा. इम्रान काझी यांनी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या आर के एम एम गुणवत्ता प्रकल्पाची माहिती विद्यार्थीनी व पालकांना दिली.
ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.सतीश शिर्के यांनी आपल्या भाषणात महाविद्यालय राबवित असणारे विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता, निकालाची उज्ज्वल परंपरा, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील महाविद्यालयाची वाटचाल व भविष्यात ज्युनिअर कॉलेजच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रा. अनिल पतंगे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. अनिल जाधव यांनी केले तांत्रिक सहाय्य प्रा. अजय जाधव यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या ऑनलाइन स्वागत समारंभाचे शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.