अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत घसरल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर राजस्थानमध्येही पेट्रोल प्रतिलिटर 4 रुपये तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या महत्त्वापूर्ण निर्णयाबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट दर कमी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यानंतर आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोलवर प्रतिलिटर 4 रुपये आणि डिझेलमध्ये 5 रुपयांची कपात होणार आहे.
गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे राज्य सरकारचा वार्षिक 3500 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. महाराष्ट्र सरकारनं याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला आधार द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान राष्ट्रीय स्तरावर पर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. यातच देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 103.97 रुपये तर डिझेल 86.67 रुपयांवर स्थिर आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.14 रुपयेप्रमाणे विक्री होत आहे.