अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- आज तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे, या तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रही आधुनिक बनले आहे. आता तर ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून बालवाडीपासूनच त्याची सुरुवात झाली असल्याने शिक्षकांबरोबर पालकांनीही हे तंत्र अवगत करुन घेणे गरजेचे झाले आहे.
परंतु हे करत असतांना आपण आपली संस्कृती, संस्कार विसरुन चालणार नाही. पारंपारिक सण-उत्सव यांना आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. यानिमित्त सुख-दु:ख वाटून घेऊन एकीची भावना यातून निर्माण होत असते. त्यासाठीच लहान वयातच मुलांना या सण-उत्सवाची माहिती होणे गरजेचे आहे.
संस्कृती कनोरे विद्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात भर पडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुक्तांगण बाल मंदिरच्या संचालिका मालतीताई गोरे यांनी केले. कल्याण रोड, ड्रिम सिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेमध्ये ‘श्रावणी भोंडला व रक्षबंधन’ कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुक्तांगण बाल मंदिरच्या संचालिका मालतीताई गोरे, सौ.पद्मजा संजय धोपावकर उपस्थित होत्या. यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती मृणालताई कनोरे, संचालिका सौ.सुरेखा शेकटकर, सौ.छाया साळी, सौ.वनिता पाटेकर, सौ.शुभदा वल्ली, सौ.शैला मानकर, मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे आदि उपस्थित होत्या.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व्हावेत, त्यांना आपल्या सण-उत्सवांची माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी विविध उपक्रम घेतले जातात.
यासाठी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थींनी रक्षाबंधन साजरे केले. तसेच महिलांनी फुगडी, भोंडला, गाणी, हळदी-कुंकू आदि कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका शुभदा भांबरे, मिनाक्षी पठारे, जगन्नाथ कांबळे, सुशिल आंधळे, राजेंद्र गर्जे आदिंनी परिश्रम घेतले.