अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- शहरासह जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून, या लढ्यात सक्षमपणे आपली भूमिका पार पाडून कोरोना विरुध्द ढाल बणून लढणारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवढे कर्तबगार अधिकारी ठरले आहे.
सर्वसामान्यांना आधार देत कोरोनाची गंभीर परिस्थिती पेलवून कोरोनाच्या चक्रव्यूहातून अहमदनगर शहर व जिल्ह्याला बाहेर काढण्यास ते यशस्वी ठरत आहे. कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले असताना एप्रिल मध्ये अनेक कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडत होते. तर सर्वच रुग्णालय व कोविड सेंटर गच्च भरुन गेले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यास दिवस-रात्र एक करुन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उत्तमपणे परिस्थिती हाताळत आहे.
अमरधाममध्ये एकाच वेळी चाळीस ते पन्नास कोरोना मृतदेहावर अंत्यविधीचे व्हिडिओ, छायाचित्र व्हायरल झाल्याने सर्वांच्या मनात धडकी भरली. जिल्ह्याची गंभीर परिस्थिती सर्वांसमोर आली. परिस्थितीला न घाबरता भोसले यांनी कोरोनामुक्त जिल्हा करण्यासाठी नियोजन करुन सर्व यंत्रणा कामाला लावली. वेळप्रसंगी स्वत: रस्त्यावर उतरुन फिरणार्यांवर कारवाई केली.
जिल्हारुग्णालयात जाऊन त्यांनी रुग्णांचे प्रश्न जाणून घेतले. तातडीने ऑक्सिजन प्लान्ट उभा केला. तर वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करुन दिल्याने अनेकांचे जीव वाचले. कोरोना रुग्णांकडून अधिक पैसे उकळणार्या हॉस्पिटलवर वचक निर्माण केला. रस्त्यावर येऊन जिल्हाधिकारी काम करतानाचे पाहून अनेकांना या अधिकार्यांबद्दल आपुलकी निर्माण झाली.
नागरिक देखील प्रशासनाच्या आवहानाला प्रतिसाद देऊ लागले. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन कोरोनाशी लढा देण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळताना नागरिकांवर काठी न उगारता कोरोनाचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आणून पोलीस अधीक्षक मनोज पाटील दुसरी बाजू समर्थपणे पेळवत आहे.
खाकी म्हंटल की डरना तो पडेगा, ही व्याख्याच त्यांनी मोडून काढली. स्वत: कोरोनातून चांगले होऊन या लढ्यात ते महत्त्वाचे योगदान देत आहे. प्रत्येक पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्यांनी प्रेम व जिव्हाळ्याने त्यांना कार्यरत केले. प्रेमाच्या आदेशाने मिळालेले काम सर्व पोलीस यंत्रणा चोखपणे पार पाडत आहे.
सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन तळागाळातील वंचितांना त्यांनी या संकटकाळात आधार दिला. पुर्वी बंदोबस्त नागरिकांना चोप देण्यासाठी असल्याचे गैरसमज त्यांनी दूर करुन हा बंदोबस्त तुमच्या सुरक्षिततेसाठी असल्याची भावना निर्माण केली. पोलीस प्रशासनाचे कोरोनाच्या संघर्षात योगदान महत्त्वाचे ठरत आहे.
शहराची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी मोठे कष्ट घेतले. सध्या महापालिकेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना उपचार मिळाले असून, हजारो नागरिक बरे होऊन घरी परतले आहेत. ग्रामीण भागातून शहरात कोरोनाच्या उपचारासाठी आलेल्या नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांचा मृतदेह नातेवाईकांना न देता महापालिकेच्या खर्चाने त्याचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी महापालिका उचलत आहे.
महापालिका उपलब्ध साधनांद्वारे या लढ्यात पाय घट्ट रोवून उभी आहे. एका खाजगी रुग्णालयाने पुर्ण बील न भरल्याने मृतदेह अंत्यविधीला देण्यासाठी अडविण्यात आले. अर्ध्या रात्री मदतीसाठी धावणार्या कुटुंबीयांच्या मदतीला सामाजिक जाण असणारा अधिकारी धाऊन आला. फोनवर संबंधीत डॉक्टराला खडेबोल सुनावून तो मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवले.
या संकट काळात परिस्थितीची जाणीव ठेऊन तडकाफडकी निर्णय घेणारा एक अधिकारी लाभल्याचे आनंद आहे. तर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी संजीवनी असणार्या ऑक्सिजन पुरवठ्याची अत्यंत किचकट जबाबदारी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवढे उत्तपणे पेळवत आहे. कोरोनाच्या संक्रमणाने सर्वच सरकारी व खाजगी कोविड सेंटर फुल असताना,
गोर गरीब कुटुंबातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होण्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या वतीने त्यांना ऑक्सिजन व औषधे पुरविण्याचे काम सुरु आहे. शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने ऑक्सिजन मिळणे कठिण झाले होते. शहरात त्या काळरात्री ऑक्सिजन संपत असताना रात्री दिड वाजता सहाय्यक आयुक्त देवढे यांना फोन केला.
त्यांनी फोन उचलून काय सेवा करु? हे वाक्य कानावर पडताच थोडा धीर मिळाला. सर्व प्रकार सांगितला असता थोड्या वेळात गाडी पोहचत असल्याचे स्पष्ट करुन ऑक्सिजन मिळण्यासाठी नियोजन करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. शेवटी गाडी आली आणि ऑक्सिजन मिळून अनेकांचे जीव वाचवता आले. गोर गरिबांना ऑक्सिजनची मदत करताना अनेक स्वयंसेवी संघटनांना पैसे कमी पडल्याने त्यांनी स्वत:च्या खिश्यातून पैसे दिले.
ऑक्सिजन अभावी कोणी मरु नये, या तळमळीने त्यांचे कार्य सुरु आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याला अशा देवदूत असलेल्या अधिकारी लाभल्याने कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी स्वयंसेवी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्यांना बळ आणि ऊर्जा मिळत आहे. या प्रशासनातील अधिकार्यांच्या कार्याला सलाम.