अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Ahmednagar News :- कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे दूध पावडरचे दर कोसळल्याचे कारण देऊन कंपन्यांनी व दूध संघांनी शेतकऱ्यांकडून १८ ते २० रुपये प्रति लिटर दराप्रमाणे दुधाची खरेदी केली. स्वस्तात मिळालेल्या या दुधाची पावडर करून साठा केला.
त्या काळात दूध पावडरचे दर १८० रुपये किलो होते. आता ते ३०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही गायीच्या दुधाला ४२ रुपये प्रतिलिटर दर द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.
यासंबंधी माहिती देताना समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, कोविड काळात मोठा तोटा सहन करून शेतकऱ्यांना दूध विकावे लागले.
त्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कोसळून १८० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले होते. गेले होते. आता दुधाचे उत्पादन सीमित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर ३०० रुपये प्रति किलोपर्यंत वधारले आहेत.
देशांतर्गत बाजारातही दूध पावडरला ३२५ रुपये दर मिळत आहे. उन्हाळ्यामुळे देशांतर्गत दुधाचे प्रमाण घटल्यामुळे दूध पावडर बनवण्यासाठी पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्याने देशांतर्गत दूध पावडरचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.
त्यामुळे येत्या काळात दूध पावडरचे दर आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. जून अखेरपर्यंत दूध पावडरच्या दरामध्ये तेजी कायम राहणार आहे. अशा पार्श्वभूमीवर गायीच्या दुधाला किमान ४२ रुपये दर देणे सहज शक्य आहे.
कंपन्या आणि दूध संघांनी कमावलेल्या नफ्यात शेतकऱ्यांना सामील करून घेण्याची त्यांची तयारी दिसत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर कोसळल्यानंतर ज्या वेगाने देशांतर्गत दूध खरेदीचे दर पाडले जातात
तितक्याच तत्परतेने दूध पावडरचे दर वाढल्यानंतर शेतकऱ्यांकडूनचे दूध खरेदीचे दर वाढवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे किमान ४२ रुपये दर शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.