अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- महसूल, पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गावर दिवसागणिक अतिक्रमणे होत असून वाहतूक कोंडीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना शहरातील वाहतूक कोंडी वाढती अतिक्रमणे याचे देणेघेणे नाही.
तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. पोलिसांना कामात रस नाही. पालिकेचे मुख्याधिकारी स्वतःची जबाबदारी विसरले असून पालिका अतिक्रमणविरोधी विभाग निव्वळ नावा पुरताच उरला आहे. यामुळे नागरिक देखील वैतागाले आहे.
वाढत्या अतिक्रमणामुळे महामार्गालाच आता आठवडे बाजारा सारखे स्वरूप आले असून शासन व जिल्हा प्रशासनाचा आदेश स्थानिक प्रशासनाकडून पायदळी तुडवला जात आहे.
मात्र निर्धास्त असलेले प्रशासन सध्याच्या या परिस्थितीकडे साफ डोळेझाक करताना दिसून येत आहे. करोना साथ आटोक्यात येत असताना लॉकडाउन उठवत जिल्हा प्रशासनाने काही नियम व अटी लादून सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी दिली.
सर्व व्यापार्यांनी लगबगीने व्यवसाय सुरू केले. मात्र मुख्य रस्त्यांवरच अतिक्रमण होऊ लागले. पालिकेतील विशिष्ठ कर्मचार्यांचे अतिक्रमण धारकांशी मैत्रीपूर्ण संबंध असून लोकप्रतिनिधी, आमदारांना व्यापार्यांसह नागरिकांच्या अडचणीचे देणे घेणे उरले नाही.
यामुळे लोकप्रतिनिधी देखील स्वतःच्या कामापुरते नागरिकांकडे लक्ष देतात, अशी भावना आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.