अहमदनगर जिल्ह्यासह पुणे असो की मुंबई अनेक भागातील लोकांकडून ॲफिलिएट, ट्रेडिंगच्या नावाखाली व जास्त लाभ देण्याच्या आमिषाने करोडोंची माया गोळा केली. विशेष म्हणजे याला बळी पडणारे सुशिक्षित सुटाबुटातले देखील माणसे होती.
लोकांची फसवणूक करणारा हा ग्रुप होता व्हीआयपीस् ग्रुप ग्लोबल ॲफिलिएट बिझनेस. आता ईडीने यावर सक्त कारवाई केली आहे. या ग्रुपचा मालक विनोद खुटे यांच्याशी संबंधित २४ कोटी ४१ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणलीये.
५८ बँक खात्यांमधील २१ कोटी २७ लाख रुपये व तीन कोटी १४ लाख रुपयांच्या ठेवी आदी मालमत्तेचा यात समावेश असून याआधी देखील मार्च महिन्यात खुटे यांच्या दुबईतील ३७ कोटी ५० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आहे.
करोडोंची माया
विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडाधे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सामान्य नागरिकांना गुंतवणुकीच्या नावाखाली व जास्त परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.
या लोकांनी कमी दिवसात जास्त परतावा देण्याच्या नावाखाली बनावट कंपन्यांच्या माध्यमांतून विविध बँक खात्यात गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करून घेतल्याची माहिती मिळाली आहे. यातील विनोद खुटे हा मुख्य आरोपी असून त्याने दुबईस्थित कंपनी मेसर्स काना कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून फसवणूक केली. या द्वारे त्याने विविध बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टो एक्सचेंज, वॉलेट सेवा, फॉरेक्स ट्रेडिंच्या नावाखाली माया गोळा केल्याचा आरोप आहे.
‘अशा’ पद्धतीने व्हायची फसवणूक व पैसे ट्रान्सफर
विनोद खुटेने याने आधी विविध कंपन्या स्थापन केल्या. जसे की, मेसर्स व्हीआयपीस् व्हॉलेट प्रा.लि.सह व्हीआयपीस् ट्रेड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स काना कॅपिटल्स लिमिटेड, मेसर्स ग्लोबल एफिलिएट बिझनेस, व्हीआयपीस् सिक्युरिटीज आदी.
या कंपन्यांमधून त्यांनी गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा करत बनावट कंपनी व खात्यांच्या माध्यमतून व्यवहारात आणली व ही रक्कम नंतर हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून भारतातून दुबईत पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. विशेषसा म्हणजे हे व्यवहार तपास यंत्रणाच्या नजरेत येऊ नये यासाठी यूएसडीटी सारख्या कूट चलनाचा वापर त्याने केला होता.