अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला आहे.
येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही,’ अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी यांनी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
मात्र यावरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली आहे. दारुबंदी उठवून गुन्हेगारी कमी होईल असा जावई शोध या ठाकरे सरकारने लावला आहे. येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला देखील हे सरकार मागे पुढे पहाणार नाही,’ असे ट्विट सातपुते यांनी केले आहे.
तसेच त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर भाष्य करताना, अंधेर नगरी चौपट राजा असा उल्लेख केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली. दारूबंदीपूर्वी १६ हजार १३२ गुन्हे दाखल झाले होते.
तर दारूबंदीनंतर ४० हजार ३८१ गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदीपूर्वी एक हजार ७२९ महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये ४०४२ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्या देखील वाढली आहे .