अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- मागील भांडणाच्या कारणातून एका तरुणास आठ-दहा जणांच्या टोळक्याने तलवार व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केल्याची घटना संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, योगेश सोमनाथ पोगुल (वय 30, रा.जय जवान चौक, इंदिरानगर) याचे शुभम शिंदे, अमित रहातेकर, धीरज रहातेकर, पंकज दुधे, रवी म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड आणि इतर दोघा-तिघांशी पाच-सहा महिन्यापूर्वी भांडण झाले होते.
याबाबत परस्परविरोधी फिर्यादींवरुन गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री शुभम शिंदे याने योगेश पोगुलशी वाद घालून त्याला जमिनीवर पडले. व त्याचवेळी अमित रहातेकर हा हातात तलवार घेऊन व धीरज रहातेकर, पंकज दुधे, रवी म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड हे हातात लोखंड रॉड घेऊन आले.
आणि म्हणाले की, मागच्यावेळी वाचला तु चुकीच्या माणसाच्या नादी लागला आहे. तुला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणून शुभम शिंदे याने हातातील तलवारीने योगेशच्या डोक्यावर वार करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना योगेशने उजवा हात आडवा घातल्याने तलवारीचा मूठ लागून हाताला दुखापत झाली.
त्याचवेळी शुभम शिंदे व रवी म्हस्के यांनी योगेशला खाली पाडून धीरज रहातेकर, अनिल गायकवाड व पप्पू गायकवाड यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने योगेशच्या दोन्ही पायांवर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तसेच टोळक्याने जखमी योगेशला जीवे ठार मारण्यासह घरच्यांसह जाळून टाकण्याची धमकी दिली.
या प्रकरणी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या योगेश पोगुल याने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे.