अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मात्र हे धंदे सुरूच राहत आहे. यातच कर्जत तालुक्यातील राशीन हे अवैध धंद्याचे माहेरघर झाले आहे.
राशिनला मोठी बाजारपेठ आहे. नगरसह सोलापूर, पुणे जिल्ह्यातील लोक येथे खरेदी, विक्री करण्यासाठी येतात. या बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होते.
मंगळवारचा जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. राशीनच्या बाजारपेठेत इतर व्यवसायाबरोबरच अवैध धंदे जोमाने चालतात. त्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
गुन्हेगारी वाढत जाते. राशीन शहरासह आसपासच्या भागात जुगार, मटका, गावठी दारू तयार करण्याचे अड्डे, देशी, विदेशी, गावठी दारू, गुटखा आदींच्या बेकायदा विक्रीतून अनेक धंदे जोरात सुरू आहेत.
पोलिसांच्या कारवाया सुरू असल्या तरी अवैध व्यवसाय मात्र बंद किंवा कमी होताना दिसत नाहीत. राजकीय वरदहस्तातून येथे अवैध धंदे फोफावल्याचे निदर्शनास येते, असे स्थानिक लोक सांगतात.
दारूच्या अवैध धंद्यामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. गावात दारूबंदीसाठी युवक आणि महिलांनी मोर्चा काढून आंदोलने केली. मात्र हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.