अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- नेवासा तालुक्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत दररोजच्या संक्रमितांची संख्या जवळपास शुन्यावर होती. क्वचितच एखादा संक्रमित आढळत असे. मात्र मार्च महिन्यात दररोज सरासरी 10 ते 15 संक्रमित आढळून येत आहेत.
नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांची संख्या पुन्हा वाढू लागली असून इतर तालुक्यांच्या तुलनेत वाढीचा वेग कमी असला तरी दररोज संक्रमितांच्या संख्येत 10 ते 15 रुग्णांची भर पडत आहे.
तालुक्याने करोना संक्रमितांचा एकूण आकडा 3100 च्या पुढे गेला असल्याची माहिती प्रभारी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील संक्रमीतांची वाढत असलेली संख्या जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी असल्याचे ते म्हणाले. दरम्यान दिलासादायकबाब म्हणजे तालुक्यातील नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सोनई, उस्थळ दुमाला,
चांदा, कुकाणा, सलाबतपूर, शिरसगाव व टोका या 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हिड लसीकरणाची सोय मागील आठवड्यापासून उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.