अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस दाट होऊ लागले आहे. यामुळे प्रशासन देखील हतबल होऊ लागले आहे.
यातच वाढती रुग्णसंख्या पाहता वैद्यकीय सेवा देखील अपुऱ्या पडू लागल्या आहे. याचाच फायदा खासगी रुग्णालयांकडून घेतला जात आहे.
राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना करोना औषधोपचारासाठी तसेच मास्क, सॅनीटायझर इंजेक्शन, औषधी यांचे दर ठरवून दिले आहेत, पण मास्कसह इतर औषधी साहित्यांची चढ्या दराने विक्री करून
या संकटाच्या काळातही रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट खासगी रुग्णालयांकडून केली जात आहे. सध्या सर्वत्र करोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीत खाजगी हॉस्पिटल यांनी भरमसाठ अव्वाच्या सव्वा बिल आकारणी बंद करावी.
शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसारच बिल आकारणी करावी, तसेच खाजगी रुग्णालयावर सरकारने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी भाजपच्या पदाधिकार्यांनी श्रीरामपूर तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरात लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. आरटीपीसीआर कोव्हिड निदान चाचणीचे दर शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार घ्यावेत. या चाचणीचे खाजगी हॉस्पिटलचे दर रुपये हजारच्या पुढे आहेत.
त्याचप्रमाणे अँटीजेन, रॅपिड टेस्टचे 350 रुपये घेतले जातात. रेमडेसीवीर इंजेक्शनचा दर तर सुरुवातीला 10 हजारपर्यंत गेला होता. त्याचे दर सुद्धा कमी करावेत. हा प्रकार थांबला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.