अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी असलेली ऑक्सिजनची गरज लक्षात घेत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे.
गुरुवार व शुक्रवारी सायंकाळपर्यंत चाकण व थेट गुजरातमधील जामनगर येथील कंपन्याकडून जिल्हयास तीन टँकरद्वारे एकूण ५९ मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा प्राप्त झाला.
यामुळे कोरोनाशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या उपचाराला काही प्रमाणात आधार मिळाला. फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची बाधा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढली. या परिस्थितीचा अंदाज घेऊन
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र,रोज वाढत जाणाऱ्या बाधितांच्या आकड्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले.
उपचारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची तूट प्रकर्षाने आढळून येते आहे. जिल्ह्यात सध्या काही रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे.
ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने एक एप्रिलच्या आदेशातच उत्पादनासाठी कच्चामाल म्हणून ऑक्सिजनचा वापर करणे बंद केले आहे.
सध्या बाधितावर उपचार करण्यासाठी असलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याची उपलब्ध मात्रा याचे प्रमाण व्यस्त आहे. या प्रमाणाचा मेळ घालण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.
तुटीचे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आता जिल्हयाबाहेर ऑक्सिजन पुरवठा करण्यास जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांटधारकांना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मनाई केली आहे. जिल्हयात चाकण,
तळोजा येथील कंपन्यातून टँकरद्वारे जिल्हयात ऑक्सिजन आणला जात आहे. गुरुवारी चाकण येथून दोन टॅकरद्वारे २९ टन ऑक्सिजन प्राप्त झाला.
यापैकी पाच टन बालाजी, कऱ्हे (संगमनेर) व पाच टन प्रवरा ग्रामीण रुग्णालय ( प्रवरा लोणी), शासकिय रुग्णालय, नगर १२ टन व नगर एमआयडीसीतील हायटेक येथे सात टन ऑक्सिजन पुरवठा केला.
काल शुक्रवारी गुजरात मधील जामनगर येथून २४ टनाचा एक व चाकण येथून एक असे दोन टँकर आले. यापैकी जामनगरच्या टँकरमधील १२ टन ऑक्सिजन जिल्हा शासकिय रुग्णालय प्लांट व उर्वरीत एमआयडीसीतील हायटेक प्लांटमध्ये जमा करण्यात आला.
तसेच शुक्रवारी चाकण येथून आलेल्या टँकरमधील ऑक्सिजन पैकी ६ टन बालाजी, कऱ्हे (संगमनेर) मध्ये जमा करण्यात आला.