अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- कोरोनाच्या संकटकाळात नागरिक आरोग्याप्रती जागृक झाले. तर आरोग्यासाठी उपयुक्त असलेले योग, प्राणायामाचे महत्त्व सर्वसामान्यांना कळले. प्रदुषणमय वातावरणात श्वसनाचे अनेक आजार नागरिकांना जडत असून, श्वसन तंत्र बलवान बनविण्यासाठी भश्रीका प्राणायाम अत्यंत प्रभावी असल्याचे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब निमसे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने तपोवन रोड येथील संचारनगर माऊली मंदिरात कायमस्वरूपी स्थायी निःशुल्क प्राणायाम वर्गाचे उद्घाटन प्रा. निमसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पहाटे 6 ते 7 या वेळेत सुरु झालेल्या निःशुल्क प्राणायाम वर्गास परिसरातील नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला आहे.
पुढे बोलताना प्रा. निमसे म्हणाले की, कोविड-19 मध्ये ज्या व्यक्तीचे श्वसन तंत्र मजबूत आहे. त्या व्यक्तीला कोरोनाचे गंभीर परिणाम भोगावे लागले नाही. कोविड पॉझिटिव्ह असला तरी श्वसन तंत्र मजबूत असल्याने त्यांच्यामध्ये रोगाचे सौम्य लक्षण दिसून आले. श्वसन तंत्र मजबूत असेल तर कोरोनासह इतर आजारांचा देखील आपण प्रतिकार करु शकतो. स्वामी रामदेवजी महाराज यांनी पहाटे आठ प्राणायाम करणे जरुरी असल्याचे सांगितले आहे.
त्यामध्ये भश्रीका प्राणायाम अत्यंत महत्वाचे आहे. भश्रीका प्राणायाम करण्याची पद्धत अत्यंत सोपी असून, अडीच सेकंद श्वास फफ्फुसात भरायचा आणि न रोखता तो पुन्हा अडीच सेकंदात सोडायचा ही क्रिया किमान 5 मी करावी लागते. यामुळे फफ्फुस बलवान बनून शरीराच्या संपूर्ण अवयवांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
समितीच्या वतीने योगशिक्षक हेमंत फिरके व स्मिता फिरके माऊली मंदिरात प्राणायाम वर्ग घेणार आहेत. यामध्ये योगगुरु स्वामी रामदेवजी महाराज यांचा संपुर्न योगाचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासह शिकविला जाणार आहे. हे शिबीर मोफत असून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पतंजली समितीच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ज्योत्सना महाजन, मधुकर निकम, बाळासाहेब जाधव, शिवाजी चाफे, रुपाली चाफे, भरती क्षिसागर आदी परिश्रम घेत आहे.