अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- खोटे फ्रंटलाईन वर्कर दाखवून तसेच पंचेचाळीस वर्षाच्या खालील व्यक्तिना नियमबाह्य लसीकरण करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी इसळक निंबळक येथील अनामप्रेम संस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी तसेच स्थानिक कोरोना समितीवर कायदेशीर करावी.
अशी मागणी निंबळक येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निंबळक येथे झालेल्या सर्व लसीकरणातील सत्रांमध्ये राजकीय दबावातून लाभार्थी निवडण्यात आले तसेच नियमबाह्य लसीकरण करण्यात आले.
सरकारी आदेश असताना सामान्य जनतेची दिशाभूल करून आलेले डोस कमी दाखवून ४५ वर्षा खालील व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. तसेच खोटे फ्रंटलाईन वर्कर दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आली व नियमबाह्य लसीकरण करण्यात आले.
संस्थेच्या लेटर हेड वर १९ इतके खोटे फ्रंट लाईन वर्कर दाखविले. तसेच त्यांचे बनावट ओळखपत्र दिले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शासन आदेश उल्लंघन केल्याने कायदेशीर कार्यवाही करावी.
तसेच या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून लसीकरण बोगसपणे करवून घेणारे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक निंबळक यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.