ITR Missed : करदात्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण अर्थ मंत्रालयाकडून आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयटीआर दाखल करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 ही अंतिम तारीख दिली होती.
तरीही अनेकांनी आयकर भरला नाही. त्यामुळे त्यांना आता मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. आयकर चुकवणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच याबाबत एक अपडेट जारी झाले आहे.
पुन्हा भरता येणार का आयकर?
प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 234F अंतर्गत विलंबित ITR फाइलिंगसाठी उशीरा फाइलिंग फी/दंड आकरण्यात येतो. परंतु, आता विलंबित ITR दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असून अनेकांना पुढे काय होणार असा प्रश्न पडला आहे. अहवालानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 31 डिसेंबरची अंतिम मुदत चुकवली तरी, जोपर्यंत प्राप्तिकर विभाग कर सूचना पाठवत नाही तोपर्यंत तो व्यक्ती आयटीआर दाखल करू शकणार नाही.
भरावा लागणार दंड
विलंबित ITR भरण्यासाठी उशीरा भरण्याचे शुल्क आर्थिक वर्ष 2017-18 पासून प्रभावी आहे. कायद्यानुसार, दंड/विलंब भरण्याची फी दोन प्रकारे पाहिली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने ITR भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 31 जुलैनंतर ITR भरला असेल तर त्याला 5,000 रुपयांचा दंड लागू होणार आहे. जर उशीर झालेला ITR देखील 31 डिसेंबरपर्यंत दाखल केला नाही आणि 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान दाखल केला असेल तर 10,000 रुपयांचा दंड लागू होणार आहे.