अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-मुंबईतील उंच इमारतींमधील रहिवाशांमध्ये ॲण्टीबॉडीजच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टीतील रहिवाशांच्या रोगप्रतिकारक शक्तीत (ॲण्टीबॉडीज) घट झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात ३६ टक्के नागरिकांमध्ये कोरोना रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे.
पुरुषांमध्ये हे प्रमाण ३५ टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण ३७ टक्के इतके आहे.मुंबई महापालिके ने नमुना निवड पद्धतीचा उपयोग करून सेरो सर्वेक्षण केले आहे. सेरो सर्वेक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात १० हजार १९७ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले.
यात रक्तांमध्ये कोरोना विषाणूविरोधात ॲण्टीबॉडीज तयार झाली आहेत का, हे पाहाण्यात आले. रक्तात ॲण्टीबॉडीज तयार होणे म्हणजे आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार होणे. अशी रोगप्रतिकार शक्ती मुंबईतील ३६.३० टक्के नागरिकांमध्ये आढळली आहे.
यापूर्वी दोनवेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले असून हे तिसरे सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात २७ टक्के नागरिकांमध्ये ॲण्टीबॉडीजचे प्रमाण आढळले होते.
मात्र, हे सर्वेक्षण काही प्रभागातच झाले होते. जुलै २०२० मध्ये काही प्रभागात झालेल्या सर्वेक्षणात झोपडपट्टीतील ५७ टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळली होती.
त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण ४५ टक्क्यांवर आले. तर आता हे प्रमाण ४१.६ टक्क्यांपर्यंत खाली आहे.