साथीच्या आजारांची वाढली भीती! रुग्णालय भरू लागली तुडुंब

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- कोरोना साथीच्या भीतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोक आजार अंगावर काढत आहेत. मात्र आता ताप, सर्दी, खोकला आदी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

यामुळे डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. साथीचे आजार बळावू लागले आहे, हे आजार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिला.

आमदार जगताप यांनी जुन्या महापालिका कार्यालयात मंगळवारी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ.सतीष राजूरकर आदी उपस्थित होते. शहरात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराने शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात.

नागरिक घाबरू जाऊन रुग्णालयात दाखल होत आहेत. उपचारासाठी खर्च येत असल्याने, त्याच्यावर मोठा आर्थिक ताण पडतो. त्यामुळे या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली. आजार कोणताही असो, घाबरायचे कारण नाही. लोकांनी आपली तत्काळ तपासणी करून घ्यावी.

प्रत्येक आजार कोरोना असत नाही. अन्य आजार अंगावर काढणे कधीकधी जीवघेणे ठरू शकते. अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

या गोष्टींची अवश्य काळजी घ्या…

नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील तसेच घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, सध्या येणाऱ्या सणासुदीच्या काळात शिळे, उघडय़ावरील अन्नपदार्थ आणि कापलेली फळे खाऊ नयेत,

साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, सात दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवू नये, साठविलेल्या पाण्याच्या पिंपावर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंटय़ा, वाहनांचे टायर, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office