आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली; जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ डेंग्यूचे रुग्ण वाढले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढतो. गेल्या वर्षी करोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात होते, तर डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते.

परंतु या वर्षी करोनासह डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात देखील डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

जिल्हा रुग्णालयात डेंग्यूची चाचणी सुरू करून डेंग्यू रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेला दिला आहे. जिल्ह्यात डेंग्यू रुग्नांची संख्या वाढत असून तापीच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे डेंग्यूचे आढळून आले आहेत.

जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव होत असताना प्रशासन मात्र निर्धास्त आहे. कोणत्याही उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे चांगलेच संतापले. कोरोनासोबतच पावसाळी साथीचे आजार वाढत आहेत. सध्या अधूनमधून पाऊस सुरू असल्याने डासांचे प्रमाणही वाढलेले आहे. शहर व जिल्ह्यातील दाट लोकवस्ती, झोपडपट्टी तसेच सोसायट्यांमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.

तापाचे रुग्ण वाढत असून त्यात निम्मे रुग्ण डेंग्यूचे संशयित म्हणूनच आढळून आलेले आहेत. डेंग्यूच्या संशयितांची संख्या जास्त आहे. मात्र, त्यांच्या चाचण्या होत नसल्याचे दिसून आले आहे.

अशा संशयित रुग्णांची डेंग्यू चाचणी करण्याचा आदेशही विभागीय आयुक्तांनी दिला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात उपचार करावेत. डेंग्यू रोखण्यासाठी फवारणीसह इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचनाही यंत्रणेला दिल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office