अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-यंदाच्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला पसंती दिली.

मात्र सोयाबीनच्या बियाणांतही आता लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे, उशिरा येणारे बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला अथवा जास्त झाला तरी, शेतकरी मालामाल होत आहे.

यंदाच्या हंगामात सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी या पिकाकडे वळले.

जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. यंदा शेतकऱ्यांनी बाजरी, कपाशी या पिकांच्या तुलनेत सोयाबीनला प्राधान्य दिले.

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात सोयाबीनच्या लागवडीस प्रारंभ होतो. झटपट येणाऱ्या सोयाबीनच्या बियाणाची लागवड केल्यानंतर तीन महिन्यात हे पीक काढण्याच्या स्थितीत येते.

त्यामुळे सुरुवातीला व मध्ये केव्हाही पाऊस झाला तरी, या पिकाला फायदाच होतो. यामुळे कमीवेळात शेतकऱ्यांच्या हाती पैसे राहतो. यामुळे शेतकऱ्यांची देखील या पिकाकडे ओढ निर्माण झाली आहे.