pअहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्याचा संपूर्ण परिसर धुक्याने वेढला गेला होता. चालू रब्बी हंगामात कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाबरोबरच गहु, हरभरा, भाजीपाला, फळे, उस आदी पिकांची लागवड केली आहे.
या धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे रोगाची भिती वाढली आहे. शेतीवर येणारी संकटे काही थांबायला तयार नाहीत.
परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे.हे धुके जैविक बुरशीसाठी प्रतिकुल आहे. बुरशीजन्य बरोबरच अन्य आजार वाढण्याचा मोठा धोका आहे. त्यासाठी एम 45 किवा सिक्सर, साफ, स्कोर त्याचप्रमाणे मेटारायझम किंवा बिवेरीया जैविक बुरशीनाशके एका एकरासाठी पीक परिस्थिती पाहुन 200 ते 250 मिली घेवुन पाण्यात सायंकाळी 4 ते 6 दरम्यान फवारणी करावी.
ही फवारणी केल्यानंतर 8 ते 15 दिवसाच्या अंतराने रासायनिक किटकनाशके वापरावी, असा सल्ला जळगाव तेलबिया संशोधन केंद्राचे कृषीतज्ञ पोपटराव खंडागळे यांनी दिला आहे.
दरम्यान तालुक्यात वाढत्या धुक्यामुळे औद्योगिक उत्पादन कारखानदार कामगार कामावर उशिरा आले. शालेय विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. शहरालगत नगर मनमाड महामार्ग तसेच नागपुर मुंबई द्रुतगती मार्गावर व शिर्डीकडुन ये जा करणारी वाहने अत्यंत संथगतीने चालु होती.
ग्रामिण भागात मस्तपैकी शेकोट्या पेटल्या होत्या. थंडीसाठी चहा, कॉफी, दुधाचा स्वाद आर्वजून घेतला जात होता.