Border-Gavaskar Trophy 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही दिग्ग्ज संघांमध्ये 4 कसोटी सामन्यांच्या सीरिजमधील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला आहे. भारतीय संघाने या सामन्यात शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे.
या विजयासह भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या सामन्याचा हिरो ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर मोठ्या विजयानंतर भारत WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणत्या स्थानी आहे जाणून घेऊयात.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलचे समीकरण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने पूर्णपणे बदलले आहे. भारताने 61.67 च्या विजयाच्या टक्केवारीसह फायनलसाठी आपली पकड आणखी मजबूत केली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ 58.93 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर होता, परंतु, आता मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघ 61.67 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यापूर्वी 75.56 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर होता, परंतु, आता पराभवानंतर 70.83 विजयाच्या टक्केवारीसह हा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या विजयामुळे भारतीय संघाला टक्केवारीत खूप फायदा झाला, तर ऑस्ट्रेलियाला तोटा सहन करावा लागला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया नाही तर, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका सुद्धा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलचे दावेदार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज असून भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलेले नाही. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर सिरीजमधील उर्वरित तीन सामन्यांपैकी कमीत कमी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.