अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :-सीडीएस बिपीन रावत यांच्या विमानाच्या अपघातानंतर पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे मिग-21 (MiG 21) हे लढाऊ विमान काल संध्याकाळी राजस्थान मधील जैसलमेरजवळ कोसळले आहे.
या दुर्घटनेत पायलटच्या मृत्यू झाला आहे. वैमानिक विंग कमांडर हर्षित सिन्हा असे मृत पायलटचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला.
यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घठनास्थळी पोहोचले. यानंतर माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनही घटना स्थळी पोहोचले.
संबंधित वैमानिकाला वाचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला, पण ते गंभीररित्या भाजले होते आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. हे विमान नेमके कशामुळे क्रॅश झाले हा तपासाचा विषय आहे.
मात्र, खराब हवामान होते, तांत्रिक बिघाड झाला होता, की आणखी काही कारणामुळे विमान कोसळले, यासंदर्भात हवाई दलाकडून तपशीलवार तपास केला जाईल.
दरम्यान पोलीस आणि अग्नीशमन दलाचे पथक हे घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेची माहिती देणारे ट्विट हवाईदलाने केले.
मिग-२१ यांना उडत्या शवपेट्या म्हणून अनेकांनी टीका केली होती. कारण, या लढाऊ विमानांचे सातत्याने अपघात झाले आहेत.